आरसीएफच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा

| अलिबाग | वार्ताहर |

आरसीएफ थळमधील सेवानिवृत्त कर्मचारी हे मुंबई येथील आरसीएफ एक्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन या संस्थेचे सभासद आहेत. ही असोसिएशन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍न सोडवण्याकरिता प्रयत्न करीत असते. त्यानुसार ही सभा आरसीएफ वसाहतीमधील पंचकोनी गणेश मंदिरामध्ये बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी आयोजित केली होती.

या सभेमध्ये सुरुवातीला आरसीएफ एक्स एम्प्लॉईज रिटायर्ड फोरमचे अध्यक्ष रवी वर्तक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सभेकरिता मुंबईहून आरसीएफ एक्स एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे अध्यक्षसतीश देशपांडे, जनरल सेक्रेटरी मालुसरे, पी.एम. दिघे, बालसुब्रमण्यम व राजेंद्र कासार तसेच इतर पदाधिकारी हजर होते. या सर्वांचे प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सतीश देशपांडे, अध्यक्ष आरसीएफ एक्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन यांनी उपस्थित सभासदांना वाढीव पेन्शनबाबत सविस्तर माहिती सांगितली. आपल्याला जर आपल्या हक्कासाठी लढायचे असेल तर आता कायदेशीर लढाई देणे हा एकच उपाय आता आपल्यापुढे आहे, असे सांगितले. याबाबत देशपांडे यांनी उपस्थित सभासदांकडून त्यांचे मतसुद्धा विचारून घेतले व शेवटी सर्वानुमते वाढीव पेन्शनबाबत ईपीएफओने घेतलेल्या आडमुठ्या व असहकारितेच्या धोरणाबद्दल कोर्टामध्ये दाद मागण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यासाठी इतर आरसीएफसारख्याच एक्झामटेड ऑर्गनायझेशनमधील कर्मचारी संघटनाबरोबर एकत्रितपणे लढा देण्याबाबतसुद्धा एकमत झाले. या सभेला सुमारे 275 सभासद हजर होते. कार्यक्रमाचे शेवटी रमेश म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले. आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम, थळमधील कोअर ग्रुप सभासदांनी ही सभा यशस्वी होण्याकरिता हातभार लावला.

Exit mobile version