| चिरनेर | वार्ताहर |
शेतकऱ्यांनी भातशेती, आंबा, भाजीपाला उत्पादनाबरोबरच पशुपालन करून त्याचे संगोपन करावे, देशी गाई पाळाव्यात आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या प्रतीच्या दुधाचा ब्रँड तयार करावा की ज्यामुळे आपले आर्थिक उत्पन्न वाढण्याला मदत होईल. असे प्रतिपादन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. गुणवंत पाटील यांनी केले. ग्रामपंचायतीच्या सभागृहात शेतकरी व पशुपालकांची सभा घेण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात सरकारी निधी आता शासन उपलब्ध करून देत आहे. चिरनेर परिसरातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना पशुसंवर्धन व शेती विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शेती व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाटील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष डाबेराव पशुधन पर्यवेक्षक डॉ. महेश शिंदे, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, पोलीसपाटील संजय पाटील तसेच कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापुढे त्यांनी, पशुपालकांना राष्ट्रीय पशुधन, अभियान अंतर्गत कुक्कुट पालन, शेळी पालन, वराह पालन, पशुखाद्य व चारा निर्मिती योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
पशुधन विकास अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने यांनी पशुपालकांना राज्यस्तरीय नावीन्य पुर्ण योजना, वैरण विकास योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना कुक्कुट पिल्ले वाटप योजना विषयी उपयुक्त माहिती दिली.