पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर
| रायगड | खास प्रतिनिधी |
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणातील पाचही आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहे. चौकशीला येण्याबाबत पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे, मात्र राहत्या घराच्या पत्यावर ते सापडत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पाच आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.
एन.ड.ी स्टुडीओतील रंगमंचावर प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा गळफास घेऊन लटकलेला मृत देह पोलिसांना 2 ऑगस्ट 2023 रोजी आढळून आला होता. याप्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांच्या विरोधात 4 ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबतची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामध्ये रशेष शहा, राज कुमार बन्सल, केयुर मेहता, स्मित शहा, प्रशासक जितेंद्र कोठारी या पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांवर देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
आतापर्यंत पोलिसांनी एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, अकाउंटन्ट आणि आर्थिक सल्लागार यांच्याकडून कर्ज प्रकरणाची माहिती घेतली आहे. तसेच आरोपींना देखील चौकशीसाठी बोलावले होते. याबाबत त्यांना खालापूर पोलिसांनी नोटीस देखील बजावली होती. मात्र उपलब्ध असलेल्या पत्यावर ते सापडत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहा आणि बन्सल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. सध्या या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.