| चणेरा | प्रतिनिधी |
मुरुडचे भाजपा उपतालुका प्रमुख परेश किल्लेेकर यांनी गुरुवारी (दि.24) भाजपला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. हा सोहळा मुंबईतील शिवसेना भवनात पार पडला.
यावेळी माजी खा. अनंत गीते, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, मुरुड तालुका संपर्कप्रमुख गजानन पाटील, मुरुड तालुका प्रमुख नौशाद दळवी, युवा सेनेचे पदाधिकारी सुधीर धाने, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परेश किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली मुरुडमधील असंख्य महिला कार्यकर्त्यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात जाहीर प्रवेश केला. भाजपा पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी पक्ष सोडला असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे हिंदू बंधू भगिनींसह मुस्लिम बंधू भगिनीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हे प्रवेशाच्यावेळी दिसून आले.
परेश किल्लेकर यांनी भाजपात असताना अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले. त्यामुळे त्यांना मुरूडमधील मतदारांनी पाठिंबा दिला. परेश किल्लेेकर यांनी भाजपा सोडल्याने मुरुडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश करताच माजी मंत्री खा. अनंत गीते यांनी त्यांना युवा सेना उपजिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. तसेच त्यांना पदभार देण्यात आला.