| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायत आणि गावपंच कमिटी ग्रामस्थ मंडळ यांनी पेण पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दुरशेत या गावातील काही तरुणांकडून खरोशी गावाबाबत जाणीवपूर्वक बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. तसेच, खरोशी गावाची प्रतिमा मलिन होईल, अशा प्रकारे चुकीची माहिती व वक्तव्ये पसरवून दुरशेत ग्रामस्थांना चिथावणी देण्याचे कृत्य केले जात आहे. दुरशेत येथील काही तरूणांनी स्वयंभू केळंबादेवीचे नवरात्र उत्सवामध्ये बॅनर फाडले. तसेच, देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांचा अपघात होऊन खरोशी गावाची बदनामी कशी होईल, या हेतूने खरोशी-दुरशेत या दोन गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाच्या जाळ्या काढून फेकून दिल्या. तसेच, सोशल मीडियावर खरोशी गावाविषयी व केळंबा माऊलीविषयी अपशब्द वापरून बदनामी करणे. उत्सवामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी आपल्या गाड्या दुरशेत गावात पार्क केल्यामुळे गाड्यांची हवा काढून गाड्यांचे नुकसान केले. खरोशी व दुरशेत या दोन गावांना जोडणारा मंजूर झालेला नवीन पूल बांधण्यास विरोध दर्शवून शासनाच्या विकासाकामात अडथळा निर्माण कारण्यासाखे कृत्य केल्यामुळे खरोशी गावाची बदनामी झाली असून, दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये गैरसमज, द्वेष, वैमनस्य व तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे गावांमधील शांतता व सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच भविष्यात वादविवाद किंवा अनुचित घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
खरोशी ग्रामस्थांचे पेण पोलिसांना निवेदन
