। मुंबई । प्रतिनिधी ।
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे. उरत्या वयात वृद्ध आणि निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याने गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकार मुंबई महानगर क्षेत्रात ग्रोथ हब बनवत असून आहे. त्यानुसार येथे येणार्या अधिकारी, कर्मचार्यांना घरे उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडाच्या माध्यमातून लाखो घरे उभारली जाणार आहेत. त्याचा भाग म्हणून म्हाडा सुरूवातील मुंबईत अंधेरीतील आराम नगर येथे तर ठाण्यात माजीवाड्यातील विवेकानंद नगर सर्वसोयींनी सुसज्ज असे वृद्धाश्रम बांधणार आहे.
याशिवाय भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फे देखील वृद्धाश्रम उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. सदरच्या वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून अंतिम आराखडा तयार केला जाणार असून त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. सध्या मुंबई, ठाण्यासह परिसरात घरांचे दर गगणाला भिडलेले आहेत. दोन-तीन वर्षासाठी येणार्या नोकरदार महिलांना येथे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाकडून वसतीगृहे उभारण्याचेदेखील म्हाडाचे नियोजन आहे.