। मुंबई । प्रतिनिधी ।
म्हाडाच्या कोकण मंडळाने 2 हजार 264 घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली असून त्याला इच्छुक अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. 11 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान 2 हजार 264 घरांसाठी अनामत रक्कमेसाठी केवळ 2 हजार 514 अर्ज दाखल झाले आहेत. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली असून आता अर्ज विक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. त्यानुसार लवकरच मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुदतवाढ दिल्यास 27 डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
कोकण मंडळाच्या घरांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना कोकण मंडळाची घरेच विकलीच जात नसल्याचे चित्र आहे. रिक्त घरे विकण्यासाठी मंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र या घरांची विक्रीच होत नाही. रिक्त घरांच्या विक्रीची चिंता असतानाच आता मंडळाच्या सर्वसाधारण सोडतीतील घरांकडेही इच्छुकांनी पाठ फिरविली आहे. कोकण मंडळातील 2,264 घरांच्या विक्रीसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन 40 दिवस पूर्ण झाले, तरी या प्रक्रियेला प्रतिसादच मिळताना दिसत नाही.