। पालघर । प्रतिनिधी ।
वाडा तालुक्यातील शेतकर्यांनी यंदा पावसाच्या भीतीने भात कापणीसोबत घाईघाईने झोडणीलाही सुरुवात केली आहे. झोडणी करून शेतात ठेवलेल्या पेंढ्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर तो व्यवस्थित रचून ठेवला आहे. मात्र, पेंढा खरेदी करणारे स्थानिक व्यापारी लबाडीने भाव कमी करण्यासाठी शकल लढवित आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कमी किमतीत आपला पेंढा विकावा लागत आहे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही लूट थांबण्यासाठी व पेंढ्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी तालुक्यात विभागवार पेंढा खरेदी केंद्र सरकारकडून उभारले जावेत, तसेच शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील स्थानिक पेंढा खरेदी करणारे छोटे-मोठे व्यापारी संगनमत करून हेतुपूर्वक काही दिवस पेंढा खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. तसेच, मुंबई व वसई शेजारील पट्ट्यात म्हशींच्या तबेल्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे पेंढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून तेथून कुणी व्यापारी थेट पेंढा खरेदी करण्यासाठी येत असेल, तर त्याला हे स्थानिक व्यापारी मज्जाव करत असतात. त्यांच्याशी हुज्जत घालून त्याला परत पाठविण्याचे प्रकार केले जातात. काही दिवसांनंतर अचानक पेंढा खरेदी करण्यास हे स्थानिक छोटे-मोठे चालबाज व्यापारी संगनमत करून शेतकर्यांच्या शेतावर जातात, तर त्यांच्याकडून यंदा पेंढा मुबलक प्रमाणात आहे पुढे आणखीन भाव कमी होणार आहे. पावसाचा काही नेम नाही, पाऊस पडला तर तुमचा पेंढा वाया जाईल, अशी अनेक भीतीयुक्त कारणे व्यापार्यांकडून पुढे केली जातात, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.