मियामी खुली टेनिस स्पर्धा; श्‍वीऑनटेकला अजिंक्यपद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पोलंडच्या इगा श्‍वीऑनटेकने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवले. तिने अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाला 6-4, 6-0 असे सरळ गेममध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. या विजयानंतर श्‍वीऑनटेक सोमवारी अ‍ॅखश्‍ले बार्टीला मागे टाकत महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेईल. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणार्‍या बार्टीने गेल्या महिन्यात टेनिसमधून निवृत्ती घेतली.
मियामी स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत 20 वर्षीय श्‍वीऑनटेकने पहिल्या सेटमध्ये ओसाकाची सर्व्हिस मोडीत काढत 3-2 अशी आघाडी घेतली. मग चांगला खेळ सुरू ठेवत पहिला सेट 52 मिनिटांत 6-4 असा आपल्या नावे केला. ओसाकाने पहिल्या सेटमध्ये श्‍लीऑनटेकला आव्हान दिले. मात्र, दुसर्‍या सेट ओसाकाने निराशाजनक खेळ केला. श्‍वीऑनटेकने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर ओसाकाला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही आणि दुसरा सेट 6-0 असा मोठ्या फरकाने जिंकत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. श्‍वीऑनटेकचे 2022 मधील हे तिसरे जेतेपद ठरले आहे.

Exit mobile version