मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटला; 25 प्रवासी भाजले


। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

असगोलीहून प्रवाशांना घेऊन येणार्‍या मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे पाणी पाईपमधून वेगाने बाहेर पडले. हे गरम पाणी गाडीतून उतरणारे प्रवासी आणि गाडीतील अन्य प्रवाशांच्या अंगावर उडाल्याने यात 25 जण भाजले आहेत. या गोंधळातच एक महिला गाडीतून उतरताना पडून जखमी झाली आहे. यातील दोघा जखमींवर गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुहागरवरून असगोलीला गेलेली मिडीबस सकाळी 10.30 च्या सुमारास गुहागर खालचापाट येथील बँक ऑफ इंडिया समोर आली. यावेळी मिडीबसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. बँकेत कामाला जाणारे कर्मचारी येथे उतरत असताना मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटला. पाईपमधून गरम, हिरव्या पाण्याचा फवारा उडाला. यामुळे 25 जणांचे पाय भाजले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. भीतीने गाडीतील प्रवासी बाहेर पडण्यासाठी धावपळ करू लागले. या धावपळीत एका वयस्कर महिलेचा तोल गेला आणि ती गाडीबाहेर पडली. आणखी एक महिलाही या धावपळीत घसरून पडली. या दोन महिलांना गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version