| पनवेल | वार्ताहर |
पोस्ट ऑफिस आणि इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने चक्क एका पोलीस अधिकाऱ्याच्या भावाला अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गणेश वसाराम राठोड असे या भामट्याचे नाव असून, कामोठे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या भामट्याने अशाच पद्धतीने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेला 24 वर्षीय तरुण ऋषी हा कामोठे भागात राहत असून, त्याचा मोठा भाऊ पोलीस अधिकारी आहे. 2024 मध्ये गणेश राठोड हा या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आला होता. दरम्यान, त्याने सरकारी नोकरी मिळवून देत असल्याचे या पोलीस अधिकाऱ्याला सांगून त्याने ऋषी याला सरकारी कार्यालयात नोकरीला लावतो, असे सांगत त्याच्याकडून ऑक्टोबर 2024 मध्ये मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याने ऋषी याला सीएसटी येथील जीपीओ कार्यालयात पोस्टल क्लार्क पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर गणेश राठोड याने ऋषी याच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, ऋषीने गणेश राठोड याच्या भावाच्या खात्यावर 50 हजार रुपये, तर 2 लाख रुपये त्याच्या पत्नीच्या खात्यावर पाठवले होते. त्यानंतर ऋषी हा गणेश राठोड याच्याकडे नोकरीबाबत नेहमी विचारपूस करत होता. मात्र, तो विविध कारणे सांगून टाळाटाळ करत होता. या कालावधीत गणेश राठोड याने तुकाराम कोळी याला देखील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून देखील त्याने 1 लाख रुपये उकळल्याची माहिती ऋषी याला मिळाली.
त्यावर एप्रिल 2025 मध्ये गणेश राठोड याने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टॅक्स असिस्टंट पदासाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 30 मे 2025 रोजी ऋषी आणि तुकाराम कोळी या दोघांना चर्चगेट येथील इन्कम टॅक्स कार्यालयात तसेच महालेखापाल कार्यालयात नेले. त्या ठिकाणी बनावट अधिकारी द्वारे त्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा बहाणा केला. तसेच कामावर रुजू होण्यासाठी मंगळवारची तारीख देऊन दोघांकडून अनुक्रमे अडीच लाख रुपये व 4 लाख रुपये रोख स्वरूपात देण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणात गणेश राठोड आपली फसवणूक करत असल्याचे ऋषीच्या लक्षात आल्यावर त्याने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर त्याने राठोड याला पैसे परत मागण्यासाठी गत 3 जून रोजी बोलवले असता त्याने वेगवेगळ्या यूपीआय खात्यांवरून ऋषी याला 1 लाख रुपये परत पाठवले. मात्र, उर्वरित रक्कम परत केली नाही. या प्रकरणाचा तपास कामोठे पोलीस करत आहेत.