24 पालकांवर कारवाई
| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमध्ये राहणाऱ्या काही पालकांनी वास्तव्याच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे आरटीईअंतर्गत प्रवेश घेतल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. बाब काही पालकांनी तर मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट पुरावे सादर केल्याचे आढळले आहे. पनवेल शहर पोलिसांनी खोटा पत्ता व बनावट कागदपत्रांद्वारे आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊन सरकारची फसवणूक करणाऱ्या 24 पालकांवर तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्यास मदत करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीने 13 जानेवारी रोजी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. शाळेपासून एक किलोमीटर अंतरात वास्तव्यास असलेल्या पाल्यांना आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेशास प्राधान्य देण्यात येते. याचाच गैरफायदा घेत काही पालकांनी शाळेच्या एक किमी अंतरामध्ये राहत नसतानाही बनावट वास्तव्याची कागदपत्रे तयार करून त्याद्वारे आरटीईअंतर्गत पाल्यांचे प्रवेश घेतले. दरम्यान, पनवेल तालुक्यातील सर्व विनाअनुदानित बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अन्वये (आरटीईअंतर्गत) प्रवेश मिळवलेल्या पाल्यांच्या पालकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्याची पडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी दिले होते. त्यानुसार खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, विश्वज्योत विद्यालय आणि विग्बोर शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्यांची पडताळणी करून अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये 24 पालकांनी बनावट पत्ता दाखवत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केल्याचे आढळले.
सरकारची दिशाभूल केल्याचा गुन्हा
वास्तव्याच्या बनावट कागदपत्रांद्वारे आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊन सरकारची फसवणूक करणाऱ्या 24 पालकांवर तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्यास मदत करणाऱ्यांविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे व सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.