पेण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी 15 वर्षांची आहे. याबाबत पेण पोलीस ठाण्यात 24 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅप चॅटवरुन मे 2024 मध्ये ओळख झाली. त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट 2024 मध्ये मनीषने पीडित मुलीला ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’, असं बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर विज्ञान विषयाच्या नोट्स घेण्यासंदर्भात ते साई मंदिर पेण येथे भेटले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनीषने आपल्या चिंचपाडा येथील श्री शिवाली गृहनिर्माण संस्था येथे घरी बोलावले. दरम्यान, तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला ‘तू कोणाला सांगितलेस, तर तुझा व्हिडिओ व्हायलर करीन’ अशी धमकी त्याने तिला दिली. अशाप्रकारे धमकी देण्याचा प्रकार तो वारंवार करु लागला व जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करु लागला. पीडित मुलीने व्हिडिओ व्हायलर होईल या भीतीने अत्याचार सहन केला. मात्र, 23 फेब्रुवारी 2025 रोजी मनीषने पीडित मुलीला धमकावून रात्री साडेअकराच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले आणि तिला कालव्यामार्गे कासमाळ येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले.
ज्यावेळेला मनीष तिला घराजवळ सोडण्यासाठी आला, तेव्हा पीडितेच्या वडिलांनी त्याला पाहिले, तोपर्यंत मनीष तेथून पसार झाला होता. गेली सहा महिने कशाप्रकारे नरक यातना पीडित मुलगी सहन करत होती हे तिने आपल्या वडिलांना सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी मनीषला पीडितेच्या वडिलांनी त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला त्याने ‘मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही. मी तिला अशीच टाईमपाससाठी ठेवली आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, मी घाबरत नाही, माझ्या आईची वट वरपर्यंत आहे’. असं पीडित मुलीला व तिच्या वडिलांना धमकावून मनीष हा तेथून निघून गेला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. यातील अपराधी मनीष याची आई वंदना म्हात्रे हिने आपल्या राजकीय बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. परंतस्त्र‘ स्थानिक भाजपच्या नेत्यांना खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणातून काढता पाय घेतला आणि अपराध्याला शासन व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन पोलिसांनी योग्य ती न्यायाची बाजू घ्यावी, असे स्पष्ट केले. यातील अपराधी मनीषची आई भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची पदाधिकारी तसेच जिल्हा शांतता कमिटी सदस्य असल्याने आरोपी आईच्या पदाचा गैरवापर करुन पीडित मुलीप्रमाणे इतरही मुलींवर असा प्रकार केल्याचे तपासाअंती समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी जिल्हा शांतता कमिटीवरुन आरोपीच्या आईला त्वरित बडतर्फ करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. कारण, आपल्या पदाचा गैरवापर करुन आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे या प्रकरणात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चर्चा आत्ता पेणच्या नाक्या-नाक्यावर होऊ लागली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनीषला ताब्यात घेतले असून, न्यायालयात हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर अधिकचा तपास करीत आहेत. दरम्यान, तपासाअंती अनेक धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आरोपी मनीष म्हात्रेविरुद्ध फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीने केलेला अपराध हा अक्षम आहे. त्यामुळे या गुन्ह्याव्यतिरिक्त इतरही बाजू आम्ही तपासत आहोत. जास्तीच्या तपासासाठी आम्ही न्यायालयाकडे पुन्हा पोलीस कोठडीची विनंती करणार असून, आरोपीला जास्तीत जास्त सजा कशी होईल यासाठी कायद्यानुसार दोषपत्र दाखल केले जाईल.
संदीप बागुल,
पोलीस निरीक्षक
आत्ता चित्रा वाघ आवाज उठवणार का?
भाजपच्या नेत्या तथा आमदार चित्रा वाघ ह्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध सतत आवाज उठवत असतात. महिलांचा आवाज म्हणून त्या अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मात्र, आता त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकारी महिलेच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर गेली सहा महिने लैंगिक अत्याचार केला आहे. त्याविरुद्ध त्या आवाज उठविणार का, असा सवाल जनसामान्य पेणकरांना पडला आहे.