| मुंबई | प्रतिनिधी |
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील 26 वर्षीय तरुणीवरील बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईजवळील नालासोपार्यातून नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. नराधम बापाने आपल्या तीन मुलींचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 56 वर्षीय नराधम वडील एक कुख्यात गुन्हेगार असून, खंडणी, गोळीबार आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी आहे. बुधवारी (दि. 26) नालासोपारा पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. मुळचे कोकणातील असलेले हे कुटुंब वडीलांच्या सततच्या जाचाला कंटाळून मुंबईत नातेवाईकाच्या आश्रयाला आले. आरोपी नराधमला एकूण पाच मुली असून, गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. अखेर वडिलांच्या छळाला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली.
मोठी मुलगी 21 वर्षांची असून, तिच्या इतर बहिणी तिच्यापेक्षा लहान आहेत. वडिलांच्या सततच्या छळाला कंटाळून या मुलींनी अखेर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. 26) त्यांनी नराधम वडिलांविरोधात नालासोपारा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणार्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.