रायगड हादरलं! पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

। पेण । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोप्रोली येथील 23 वर्षीय विपुल पाटील याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून कासमाळ येथे फिरायला नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कासमाळ येथे नेले. तेथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पेण पोलिसांनी आरोपी विपुल पाटील याला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आल्याने अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करीत आहेत. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version