रायगडकरांचा संताप उसळला
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र रायगड समाधीस्थळी घडलेल्या प्रकाराने रायगडकरांच्या भावना चांगल्याच पेटल्या आहेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या उपस्थितीतच शांतता राखण्याचे फलक काढून टाकल्याची घटना व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे पवित्र स्थळ, स्पष्ट नियम तरीही अशी उघडपणे पायमल्ली? हा सत्तेचा माज नाही तर नेमकं काय आहे, असा थेट सवाल आता रायगडकरांकडून विचारला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. राजकीय पद मिळालं म्हणजे नियम धाब्यावर बसवायचे का? असा जाब आता उघडपणे विचारला जातोय.
रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून, मराठी अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. अशा ठिकाणी शिस्त, नियम आणि आदर यांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना, उघडपणे नियमांची पायमल्ली झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘महाराजांच्या समाधीपाशीही नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यायचा?’ असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नसून, रायगडकर मात्र स्पष्ट म्हणत आहेत. समाधीस्थळावर स्पष्ट सूचना, नियम आणि शिस्त असतानाही अशी उघड बेफिकिरी दाखवली जाणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा नाही, तर थेट त्या पवित्र ठिकाणाच्या मर्यादांचा अवमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘नियम सर्वांसाठी सारखे असतात, मग काहींना सूट का?’ असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून, ‘रायगडचा सन्मान राखला गेला पाहिजे’ अशी ठाम भूमिका घेतली जात आहे. काही संघटनांनी या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याचा आरोप असल्याने कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांसमोरच नियम मोडले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी काय शिकायचं? अशी टीका होत आहे.
राजकीय वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. रायगडातील मावळ्यांचा सूर आता अधिकच आक्रमक झाला असून, ‘महाराजांच्या भूमीत कोणताही माज चालणार नाही’ असा स्पष्ट इशारा दिला जात आहे. या घटनेमुळे केवळ एका व्यक्तीवरच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नसले, तरी संतप्त जनतेने प्रशासनाकडे उत्तरांची मागणी सुरूच ठेवली आहे. रायगडकरांसाठी हा विषय केवळ राजकारणाचा नसून भावनेचा आहे. आणि त्या भावनेला धक्का बसला, तर प्रतिक्रिया तीव्र होणारच, असे मत इतिहासप्रेमी, रायगडकरांसह ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
