आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात

कबड्डीप्रेमींना थरारक सामन्यांची मेजवानी; चार संघांची उपांत्य फेरीत धडक

| मुंबई | प्रतिनिधी |

विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आ. सुनील राऊत यांच्या पुढाकाराने आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी कबड्डीप्रेमींना थरारक सामन्यांची मेजवानी चाखता आला आली. मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम आणि आयएसपीएलसह ठाणे महानगरपालिका या संघांनी थरारक विजयासह व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली. महिला गटातही मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या उपांत्य पूर्व लढतीत मुंबई बंदरने मध्यंतराला खोलवर चढायांनी संत सोपान काका बँकेविरुद्ध 20-13 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतरानंतर संत सोपान काका संघाने वेगवान खेळ करत सामन्यात प्राण ओतले. शेवटची 5 मिनीटे असताना बरोबरीत असलेला खेळ शेवटी मुंबई बंदरने 36-32 असा जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ठाणे आणि मिरा-भायंदर महानगरपालिका यांच्यात पहिल्या मिनीटापासून संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे पहिल्या सत्रात 14-14 असा बरोबरीचा खेळ रंगला. मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या चढाईबहाद्दरांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार खेळ केला. परंतु, गुण समान रेषेतच धावत होता. अखेर शेवटच्या क्षणी ठाण्याने मीरा भायंदरला 28-25 असे मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर केला. पिछाडीनंतर बीपीसीएलच्या भन्नाट चढायांनी सीजीएसटीला बीपीसीएलविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मध्यंतराला 20-10 अशी अफलातून आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मध्यंतरानंतर बीपीसीएल संघाने पहिल्या 10 मिनीटांत आधी पिछाडी भरून सामन्यात पुनरागमन केले. त्यांनतर सीजीएसटीविरुद्ध एकेका गुणाची कमाई करत आघाडी घेतली. शेवटची 5 मिनीटे शिल्लक असताना बीपीसीएलने 33-27 अशी आघाडी कमावली होती. त्यानंतर बुद्धिचार्तुयाचा वापर करत आपली आघाडी टिकवली आणि सीजीएसटीविरुद्धचा संघर्ष 35-30 असा जिंकली. आयएसपीएलने मुंबई पोस्टलचे आव्हान 46-34 असे सहज मोडीत काढत अंतिम चार संघात स्थान मिळवले.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरींच्या सामन्यात पतंगराव कदम आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात तुल्यबळ लढत झाली. मध्यंतराला 16-16 असा खेळ बरोबरीत थांबला. मध्यंतरानंतरही गुणफलक समान रेषेतच धावत होता. अखेर पतंगराव कदम संघाने 33-31 अशी दोन गुणांनी बाजी मारली. धर्मवीर आणि श्रीराम कबड्डी संघ यांच्यातला थरारही 35-33 असा संपला. राजमाता जिजाऊ आणि विवेक स्पोर्ट्स यांच्यातही काँटे की टक्कर झाली. राजमाता जिजाऊ 24-14 अशी आघाडीवर होती. परंतु, उत्तरार्धात बरोबरीत चाललेला हा थरार विवेकने अवघ्या 38-40 अशा फरकाने गमावला.

Exit mobile version