जुन्या गाड्यांना नवे इंजिन; प्रवाशांच्या जीवाशी एसटी प्रशासनाचा खेळ
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या गोगावलेंच्या झोळीत सरकारने शेवटच्या टप्प्यात एसटी महामंडळाची जबाबदारी दिली. दरम्यान, अथक तपश्चर्येनंतर पदरात पद पडल्यावर भारावून गेलेल्या आ. भरत गोगावलेंनी पद मिळाल्यानंतर कर्तव्य बजाविण्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे आज हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी बसेसच्या दुरवस्थेकडे बघण्यात त्यांना अजिबात रस नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. परंतु, या प्रवाशांच्या जीवाशी एसटी महामंडळ खेळ करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ वर्षे जुन्या असलेल्या गाड्यांना रंगरंगोटी करून सीएनजीचे इंजिन (किट) बसविले जात आहेत. रायगड विभागात पेण, रामवाडी, रोहा, माणगाव, महाड आगारातील जुन्या गाड्यांना सीएनजीचे किट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे आ. गोगावले कधी लक्ष देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारीत अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, कर्जत व मुरूड अशी आठ आगार असून, 19 बसस्थानके आहेत. जिल्ह्यात 380 बसेस असून, दिवसाला एक लाख प्रवासी एसटीतून प्रवास करतात. या माध्यमातून एसटीला सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये महिलांसाठी अर्धे तिकीटची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागली आहे. एसटीतून प्रवास करणार्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका बसमध्ये 53 प्रवाशांची क्षमता असताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमधून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते. प्रवासी संख्या वाढूनही महामंडळाकडून अद्याप नव्या गाड्या दाखल झाल्या नाहीत. जुन्याच गाड्यांना नवे रुप देऊन त्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर पाठविल्या जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डिझेलचे वाढते दर, तसेच डिझेलच्या गाडीतून निघणारे धूर यामुळे प्रदूषण वाढत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी, एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सीएनजीवर धावणार्या बसेस रायगड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. रामवाडी, रोहा, माणगाव, महाड या ठिकाणी सीएनजी पंप सुरु केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दीडशेहून अधिक बसेस सीएनजीवर धावत आहेत. सीएनजीवर चालणार्या बसेस नवीन आल्याचा भास प्रवाशांना झाला आहे. मात्र, बसेस नवीन नसून, जुन्याच असल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ वर्षे जुन्या असलेल्या गाड्यांना रंगरंगोटी करून त्यातील डिझेलचे इंजिन काढून त्या जागी सीएनजीचे इंजिन लावण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे. जुन्याच गाडीला नवे इंजिन लावून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेण आगारातील सीएनजी एसटी बसला आग लागली होती. चालकाच्या तत्परतेने ती आग आटोक्यात आणण्यास यश आले होते. तसेच काही सीएनजीच्या गाड्या घाटमाथ्यावर चढत नसल्याच्या तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केल जात आहे.
प्रवाशांच्या सेवेत भंगार गाड्या
रायगड जिल्ह्यातील पेण, रामवाडी, महाड, रोहा, माणगाव या आगारातून सीएनजीवरील बस धावत आहे. त्यामुळे डिझेलवर चालणार्या जुन्या 25 गाड्या अलिबाग एसटी बस आगारात पाठविण्यात आल्या आहेत. सुमारे 12 लाख किलोमीटर प्रवास केलेल्या या गाड्या असून, गाड्यांची अवस्था बिकट आहे. गाडी सतत रस्त्यात बंद पडणे, चालकाच्या केबीनमधील वेल्डींग तुटलेली, गाडीतील सीट खराब झालेली, एसटीला गळती लागलेली अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भंगारात काढण्यासाठी असलेल्या गाड्या रस्त्यावर धावत असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. एसटी महामंडळाच्या या कारभाराचा तीव्र संताप प्रवाशांकडून केला जात आहे.