शेतकरी संघटनांकडून जाहीर आभार
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडसह संपूर्ण राज्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाचा फायदा व्हावा, यासाठी विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवून तसा कायदा करुन घेणारे शेकापचे अभ्यासू आ. जयंत पाटील हे बळीराजासाठी आधार बनले आहेत. त्याबद्दल जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.जयंत पाटील यांनी पेण, रोहा, खालापूरमधील एमआयडीसीच्या प्रकल्पात शेतकर्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी लक्ष्यवेधी सादर करुन सरकारचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करताना त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा कायदा करण्याची ग्वाही दिली.त्या निर्णयाचा राज्यातील प्रकल्पग्रस्तांना फायदा होणार आहे.असा कायदा करायला सरकारला भाग पाडल्याबद्दल प्रकल्पग्रस्त तालुक्यांमधील सर्व शेतकर्यांनी आ.जयंत पाटील यांचे आभार मानले.
यावेळी खालापूर, खरीवली दहागाव शेतकरी संघर्ष समिती खालापूर, अकरागाव प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे (डोलवी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त), पारंगखार ते खुटल बल्क फार्मड्रग प्रकल्पबाधित अशा शेतकरी संघटनेच्या रोहा, मुरूड, खालापूर, पेण या चार तालुक्यांचे प्रतिनिधी शांताराम पाटील, अशोक पाटील, जनार्दन खरीले, श्याम घारे, गणेश मढवी, हेमंत ठाकूर, जितेंद्र जोशी, जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, के.जी.म्हात्रे, गजानन पेढवी, लक्ष्मण कोठेकर, विजय पाटील, प्रदीप म्हात्रे, निलेश म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, महेंद्र पाटील, सर्व शेतकरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी सर्वांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निरसन करीत पुढे आणखी कोणत्या योजना राबवता येतील याच्यावर चर्चा केली.
जनतेची साथ हवीय
यावेळी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधताना आ.जयंत पाटील म्हणाले की, जनतेसाठी मी सेनापती म्हणून काम करतो. त्यामुळे जनतेची साथ मला हवीच आहे. मूळ जमिनी ज्यांच्या नावावर होत्या, त्या मूळ मालकांना त्याचा 50 टक्के वाटा वाढीवरित्या मिळावा यासाठी कायद्यात रुपांतर करुन कायद्यानेच हे पैसे शेतकर्यांना त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत, असा ऐतिहासिक निर्णय अंमलात आणताना सर्व प्रकल्पग्रस्तांचा सहकार्याचा मोलाचा वाटा लाभला. ज्यांच्यासाठी काम करायचं तेच जर सोबत असतील तर काम करताना आणखी स्फूर्ती मिळते. त्यामुळे त्यांचं सोबत असणं फार महत्त्वाचं आहे.
शेतकर्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी भूसंपादन कायद्यात सुधारणा केल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे या अमूल्य परिवर्तनाची इतिहासही नोंद घेईल.
आ. जयंत पाटील
यावेळी त्यांनी विविध मुद्यांचाही परामर्थ घेतला. शेतकरी कामगार पक्ष कायम कायद्याला धरून चालतो त्यामुळे आम्हाला कायदा कळतो आणि कायद्यावर कसं चालायचं तेही आम्हाला येतं. अशी टिपणीही त्यांनी केली.
बोलून दाखवणार्यांना करून दाखवलं
जेव्हा या कायद्यात बदल व्हावा म्हणून आम्ही धडपड करीत होतो, मोर्चे काढले होते त्यावेळी विरोधकांना सगळी मस्करी वाटत होती. परंतु, शब्दाला जागणारा आणि फक्त बोलून नव्हे तर सत्यात करून दाखवणार्या शेकापने अशक्य ते केल्याने आता टिंगल करणार्या विरोधकांची आपोआपच मुस्काटदाबी झाली आहे, असे ते म्हणाले.
सर्वात मोठा कारखाना होणार
देशातील सर्वात मोठा कारखाना रायगड जिल्ह्यात होणार. जमशेदपूर कारखान्यापेक्षाही मोठा कारखाना करण्याचा मानस असून स्थानिकांना नोकर्या देण्याचा मुख्य हेतू आहे,असे आ.जयंत पाटील यांनी सुचित केले.
स्थानिकांना रोजगार मिळणार
रायगडात जे उद्योग येणार आहेत, त्या उद्योगातल्या स्थानिकांसाठी तेथेच कॉलेज काढून त्यांचे किमान कौशल्याचे कोर्सेस काढून तिथल्या शेतकर्यांना प्रशिक्षण, प्राधान्याने नोकर्या, स्थानिकांनंतर बाजूच्या गावात, त्यानंतर तालुक्यात, त्यानंतर जिल्ह्यातील व्यक्तींना नोकर्या देण्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा घेत आहोत. तसेच प्रयत्नही करीत आहेत. नोकर्या दिल्या जातील, या सर्व गोष्टींसाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा घेत आहोत. तसेच नोकर्या देण्याचा प्रयत्न करू. असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
नैना प्रकल्प
नैना प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी शेतकर्यांच्या आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू असेही नमूद केले. फक्त शब्दांतूनच नव्हे तर कार्यातून शेकाप कायम ठळक भूमिका मांडत आलाय. त्यामुळे जनतेचा विकास करीत राहणे आणि सर्वांचा विकास करणे हा हेतू कायमच राहिला आहे. त्यामुळे हळूहळू एकएक करत रायगडचा उल्लेखनीय विकास करायचा आहे. कोणी स्वप्नातही पाहीला नसेल असा रायगडचा विकास होणार,असा दावाही जयंत पाटील यांनी केला.