| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल, तसेच तो शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उबाठा) गटाचा किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचा असेल, असा विश्वास पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
दि. 2 ऑगस्ट रोजी उलवे येथे शेतकरी कामगार पक्षाचा 77वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला. झेंड्याला सलामी देताना मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी उलवे आणि परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी सांगितले, उरणचा आमदार हा आगरी, कराडी, कोळी, मराठी समाजाचाच असेल, पण मारवाडी समाजाचा होणार नाही. तसेच आपले उद्योग, व्यवसायाचे संबंध राखून जर कोणी येथे उमेदवारी घेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल. माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून जामीन मंजूर झाला आहे. आता त्यांना पनवेलच्या जिल्हा न्यायालयातून जामीन मिळवायचा आहे. उरणच्या उमेदवारीबाबत माजी आमदार विवेकानंद पाटील हेच निर्णय घेतील आणि ते जो निर्णय घेतील, त्या उमेदवाराचा आम्ही उत्साहात प्रचार करून या ठिकाणी महेश बालदी यांना कसे पराभूत करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देऊ, असा इशाराही पाटील यांनी दिला.