ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील शहाबाज पंचक्रोशीतील धामणपाडा या गावात गेल्या सहा -सात महिन्यांत पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक घरफोडीमध्ये चोरांनी घरात घुसून घरातील पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने एवढेच नाही तर देव्हार्यातील देवांच्या चांदीच्या मूर्तीसुद्धा चोरून नेल्या. यात घरांचे व घरातील वस्तुंचेही खूप नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. संतोष पाटील, प्रशांत म्हात्रे, शुभांगी धुमाळ, चंद्रकांत म्हात्रे या ग्रामस्थांच्या घरात अनुक्रमे दोन-तीन महिन्यांआड चोर्या करण्यात आल्या आहेत. दि.22 जुलैच्या मध्यरात्री गावातील निवृत्त शिक्षक चंद्रकांत म्हात्रे व त्यांची पत्नी हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला गेला आणि यावेळी चोरांनी काही फासेसुद्धा आणल्याचे आढळले. हे फासे माणसांना बांधण्यासाठी किंवा गळा आवळण्यासाठी चोर उपयोगात आणतात. या सर्व चोरीप्रकरणाबद्दल ग्रामस्थ मंडळ धामणपाडा यांनी पोयनाड पोलीस ठाणे यांना रितसर अर्ज करून चोरांचा तपास करावा व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु, आजदेखत कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही, त्यामुळे आधीच घाबरलेले ग्रामस्थ प्रशासनाच्या या असंवेदनशील व उदासीन कारभारामुळे संतप्त झाले आहेत. तरी, पोयनाड पोलीस ठाण्याचे एपीआय संतोष दराडे यांनी याकडे विशेष लक्ष वेधून ग्रामस्थांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले आहे त्याकरिता सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.