माथेरानमध्ये मनसेच्या उपोषणाची सांगता

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील विजेच्या समस्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने उपोषण करण्यात आले होते. शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला माथेरानमधील सर्व पक्षीय यांनी पाठिंबा दिला होता. महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी माथेरान मधील सर्व कामे मंजूर असल्याचे पत्र सादर केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील वीज पुरवठा खंडित होत आहे. गेले अनेक महिने वीज पुरवठा समस्या कायम आहे. माथेरानसाठी कळंबोली आणि नेरळ किंवा कर्जत इतर ठिकाणाहून वीज पुरवली जाते. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या माथेरान फिडर आणि डिओ सारखे बंद पडत असतात. माथेरानमध्ये अनेक वर्ष सुरू असलेला वीज पुरवठा खंडित होण्याचा हा परिणाम आहे. वीज नसताना देखील माथेरानकर वीज बिल भरण्याचे काम करतात. जर तुम्ही माथेरानची जबाबदारी घेत नसाल तर तुमचे माथेरानमध्ये काम काय ? असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच माथेरानमधील वीज ग्राहकांची सहनशक्ती संपली आहे असा इशारा देत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती.

माथेरान शहरातील श्रीराम चौकात आयोजित उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला. दुपारी महावितरणचे कर्जत येथील उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी उपोषण स्थळी येऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर महावितरणकडून माथेरानमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि प्रकल्प यांची लेखी माहिती दिल्यानंतर कदम यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version