मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनसेकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह? उपस्थित होत आहे. बाबा सिद्दिकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्ताला वेगळा न्याय का? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पूर्वेत दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या झाल्ंयाचे सांगण्यात आले आहे. मनसे कार्यकर्ता आकाश माईन (27) आहे. माईन हे दसरानिमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेले होते. त्यावेळी मालाड पूर्वेत स्टेशनजवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची सुरू झाली. मालाड स्टेशनवर असलेले रिक्षा चालकाचे मित्र, फेरीवाल्यांनी यावेळी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला केला. रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजता मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्या प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्याच पद्धतीने पोलिसांनी मनसे कार्यकर्तावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी तपास वेगाने करण्यात यावा अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली आहे.

Exit mobile version