जुम्मापट्टी शाळेत लावलेले माकड पकडणारे पिंजरे

| नेरळ | वार्ताहर |
जुम्मापट्टी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील वर्गात घुसून पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला पिसाळलेल्या माकडाने चावा घेतला होता. त्या विद्यार्थिनीवर उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले असून, त्या ठिकाणी येणार्‍या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील जुम्मापट्टी या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेत 24 फेब्रुवारी रोजी शाळेच्या वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने सहा वर्षाच्या मुलीला चावा घेतला होता. पहिली इयत्तेत शिकत असलेल्या प्रज्ञा शिंगाडे या सहा वर्षाच्या मुलीला उपचारासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

स्थानिकांच्या मागणीनंतर वन विभागाने पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी जुम्मापट्टी येथे पिंजरा बसविला आहे. शाळेच्या मागे माकडांना पिंजरा बसविला आहे. त्या भागातील पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी माकडे पकडणारे यांना पाचारण केले आहे. मुंबई येथून त्यांचे पथक नेरळ येथे येणार असून, त्या पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी मिशन सुरु करतील अशी माहिती वन विभागाचे वनपाल एस.एच. म्हात्रे यांनी दिली आहे. पालकांनी यावेळी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे आग्रह धरला. त्याचवेळी ग्रामस्थ सुनील पारधी, तुळशीराम निरगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र पारधी, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील, सुनीता खैरे, माधुरी केवारी, छाया चव्हाण, वैशाली ढोले, जाधव आदींसह पालक उपस्थित होते.

Exit mobile version