घरांमध्ये घुसून अन्नपदार्थांची नासधूस; वन विभागाकडून ठोस उपाययोजना नाही
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली शहर आणि परिसरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माकडे थेट नागरिकांच्या घरांमध्ये घुसून भाजीपाला, अन्नपदार्थ तसेच घरातील वस्तू घेऊन जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी माकडांमुळे घरांच्या पत्र्यांचे देखील नुकसान होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या समस्येबाबत वन विभागाकडे वारंवार निवेदने व तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माकडांच्या वाढत्या वावरामुळे पालीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरांच्या गॅलरी, खिडक्या तसेच टेरेसवरून माकडे थेट घरात प्रवेश करत असल्याने विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माकडांना हुसकावून लावताना नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, पाली शहरातील माकडांच्या उपद्रवाबाबत संबंधित वन विभागाकडे नागरिकांकडून वारंवार निवेदने व तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाली नगरपंचायत आणि वन विभागाने समन्वय साधून माकडांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर माकडांना मानवी वस्तीत येण्यास कारणीभूत ठरणारा उघड्यावरचा कचरा व अन्नपदार्थ याबाबतही योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वारंवार निवेदने व तक्रारी करूनही समस्या कायम राहणार असेल, तर नागरिकांच्या तक्रारींची दखल नेमकी कधी घेतली जाणार? एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता पालीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि परिस्थितीनुसार ठोस उपाययोजना कराव्यात. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन वन विभागाने माकडांचा वावर असलेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करावी, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर व सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेची गरज
त्रमाकडांचा उपद्रव केवळ भाजीपाला किंवा घरातील वस्तूंच्या नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नसून, माकडे थेट घरांमध्ये प्रवेश करत असल्याने भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विभागाने कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने या समस्येवर उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
