| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबई शहरापेक्षा यंदा मोरबे धरण परिसरात अधिक पाऊस झाला असून मोरबे धरण 93 टक्के भरले आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे यंदाही धरण 100 टक्के भरण्याची आशा नवी मुंबईकरांना आहे.
पावसाळ्यापूर्वी मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणीकपात करावी लागली होती. परंतु मागील काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. काही दिवस पावसाने उघडीप दिली असली तर सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्याने लवकरात लवकर भरावे अशी आशा नागरिक बाळगून आहेत. यावर्षी सलग काही दिवस पाऊस झाला व जवळजवळ 650 ते 700 मि.मी. पाऊस झाला तर धरण 100 टक्के भरण्याची आशा आहे. 15 जूनपर्यंत मोरबे धरण परिसरात फक्त 78.60 मि.मी एवढ्याच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मोरबे धरणामध्ये फक्त 26 टक्के इतकाच कमी जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठ्यात पालिकेने वाढीव कपात करण्यात आली होती.
मोरबे धरण क्षेत्रामध्ये मंगळवार 20 ऑगस्टपर्यंत एकूण 3005 मिमी इतका पाऊस झाला आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आजमितीला अधिक पाऊस होऊनही धरणात जलसाठा कमी आहे. पुढील काही दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.