। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर यांनी 7 वर्ष भारतीय संघासोबत काम केले आहे आणि त्यांच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठी जबाबदारी मिळाली आहे. श्रीधर यांची आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जॉनाथन ट्रॉट हा संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आर श्रीधर 2014 ते 2021 दरम्यान भारतीय संघासोबत होते. त्यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले. भारताच्या वरिष्ठ संघात येण्यापूर्वी आर श्रीधर हे हैदराबाद संघाच्या 19 वर्षांखालील व 16 वर्षांखालील मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही काम केले आहे.
अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यातला एकमेव कसोटी सामना 9 सप्टेंबरला नोएडा येथे होणार आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासाठी नोएडा हे होम ग्राऊंड म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे भारतात त्यांचे सामने होणार आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. 18, 20 व 22 सप्टेंबरला हे सामने शाहजाह येथे होणार आहेत.