विद्यार्थी सुरक्षा रामभरोसे; एकूण शाळा 3,585; अवघ्या 728 शाळांमध्ये सीसीटीव्ही
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
बदलापूरसह अनेक भागात शाळकरी मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न शाळांमध्ये निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तीन हजार 585 शाळांपैकी फक्त 728 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन हजार 855 शाळा कॅमेराविना असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
बदलापूर येथील दुर्घटनेनंतर शिक्षण विभाग खडबडून जागे झाले. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. महिन्याभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाही, तर मान्यता रद्द केली जाईल, अशी ताकीद दिली आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालक चांगलेच कामाला लागले असताना जिल्ह्यातील शिक्षण विभागदेखील कामाला लागले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजार 585 शाळा आहेत. त्यात अडीच हजार शाळा या जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असून, लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयात येतात. शाळेबरोबरच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थी, कर्मचारी यांच्या प्रत्येक संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम सीसीटीव्ही कॅमेरांमार्फत केले जाते. रायगड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग मदरसा अशा अनेक सरकारी व खासगी व विना अनुदानित, अनुदानित शाळा, महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात एकूण तीन हजार 583 शाळा, शिक्षण संस्था आहेत. यापैकी फक्त 728 शाळा, शिक्षण संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित दोन हजार 855 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामध्ये दोन हजार 476 जिल्हा परिषद शाळा सीसीटीव्ही कॅमेराविनाच असल्याचे दिसून आले आहे.
निधीसाठी करावी लागणार धावपळ
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होण्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सुरु आहे.