बालग्राममध्ये मातृदिन साजरा

। सोगाव । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे रविवारी (दि.10) संध्याकाळी मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तेथील मुलामुलींनी मातृदिन या विषयावर आधारित सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला सीओएसएफ थळ युनिटचे डेप्युटी कमांडिंग ऑफिसर मा. अमित जे. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर संस्थेतील सर्व माता या कार्यक्रमाच्या मान्यवर पाहुण्या होत्या. या विशेष प्रसंगी सर्व मातांना नवीन साड्या, मुलांनी तयार केलेली शुभेच्छापत्र देण्यात आली. यावेळी काही मुलांनी आईविषयीचे आपले मनोगत मांडले. तसेच नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बालग्रामप्रमुख यांनी मा.अध्यक्ष यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखविला. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहवर्धक भावनिक वातावरणात पार पडला. या बालग्राममध्ये दाखल सुमारे सत्तरपेक्षा जास्त, अठरा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या सर्वांगीण प्रगतीची जबाबदारी ही संस्था सातत्याने पार पाडत आहे.

Exit mobile version