| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः पनवेलमधील गावदेवीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते; मात्र पुन्हा झालेल्या पावसामुळे रस्ता उखडून ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांची ये-जा सुरू असते. खड्डे चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मार्गावर पनवेल महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तसेच प्रसूती व माता-बाल रुग्णालय असल्याने गर्भवती महिला, नवजात बालके आणि तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी वर्दळ असते. नवजात बालकांना लसीकरणासाठी तसेच विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी घेऊन येणाऱ्या महिलांनाही या खड्डेमय रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
