बेलवड्यात डोंगर सरकले, घरांना भेगा

बेंदीचीवाडी, आदिवासीवाडी व मुंगोशी धोक्याच्या छायेत; 28 कुटुंबांचे स्थलांतर

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मुसळधार पावसाने डोंगराळ भाग धोक्याच्या उंबरठ्यावर आणला आहे. बेंदीचीवाडीतील आदिवासीवाडी आणि मुंगोशी परिसरात डोंगराला मोठमोठे तडे गेल्याने दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी 28 कुटुंबांतील सुमारे 80 ते 85 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही एकही शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेंदीचीवाडी परिसरातील डोंगराला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, रा. जि. प. वडाचादांड-शोळे मार्गालाही भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी जमीन सरकल्याचे स्पष्ट दिसत असून डोंगरातून दगड घसरत असल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. मुंगोशी परिसरातही दरड कोसळल्याने धोका अधिक वाढला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेलवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच हरेष पाटील आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण पाटील यांनी पुढाकार घेत नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. बाधित कुटुंबांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आदिवासीवाडीतील नागरिक गेल्या तीन दिवसांपासून जीव मुठीत धरून रात्र जागवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रवीण पाटील यांनी सांगितले की, 28 घरांतील सुमारे 80 ते 85 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही. बाधितांच्या निवास, अन्न व इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करणे आवश्यक आहे. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट सवाल करत, दरड आमच्या अंगावर कोसळल्यावरच अधिकारी येणार का? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. बाधितांना तात्काळ मदत, पंचनामा, सुरक्षित निवारा आणि कायमस्वरूपी संरक्षणाची उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तातडीने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवितो असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version