डॉ. अपर्णा पवार यांचे मार्गदर्शन; अंकुर ट्रस्टमार्फत आदिवासी महिलांसाठी प्रशिक्षण
| पेण | प्रतिनिधी |
कमी वयात लग्न केलेल्या मुलींना भविष्यात अनेक शारीरिक, मानसिक व सामाजिक समस्याना तोंड द्यावे लागते. एका अर्थाने कमी वयात लग्न प्रगतीचे विघ्न आहे, असे प्रतिपादन पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा पवार यांनी केले. त्या अंकुर ट्रस्टमार्फत आयोजित आदिवासी महिला प्रवर्तकाच्या प्रशिक्षण शिबिरात उद्घाटनपर भाषणात बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील होत्या. अंकुर ट्रस्ट व मैत्रेय-राज फाऊंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात अनुभवलेल्या तातडीच्या व आणीबाणीच्या परिस्थितीत दुर्गम आदिवासी पाड्यावर सेवा पोहोचवण्याच्या हेतूने संस्था, सरकार व आदिवासी यांच्यातील दुवा म्हणून काही आदिवासी महिलांना अनवाणी डॉक्टर म्हणून डॉ. मैत्रेयी पाटील यांनी सुरुवात केली होती. या साखळीतील एक प्रशिक्षणाचे हे आयोजन होते.
या प्रशिक्षणात सामाजिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून कार्यरत डॉ.सिराज, प्रा. निधी उपस्थित होत्या. डॉ.सिराज यांनी कमी वयात लग्न केलेल्या कुपोषित माताच्या मुलांचे भविष्य कसे असुरक्षित आहे हे सोदाहरण सह पटवून सांगितले. या कार्यक्रमात सर्वात शेवटी एकूण 20 आदिवासीवाडी प्रतिनिधींना प्रथमोपचार पेटी भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमात छाया कोकरे, मीनल सांडे, सोपान सुतार, आशिष सावंत, मनिष लांबा, निखिल अस्वारे यांनी भाग घेतला.