प्रवाशांना दिलासा
| उरण | वार्ताहर |
बोकडविरा सिडको कार्यालयासमोरील रस्त्यावरील पूल नादुरुस्त झाल्याने गेली अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून एसटी व एनएमएमटी बसची वाहतूक बंद करण्यात आली होती. याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता. याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने याचा पाठपुरावा सातत्याने करून अखेर एसटी प्रशासनाला नमवत एसटी बसच्या काही फेऱ्या सुरू करण्यास भाग पाडले आहे.
सिडको फुंडे पूल नादूरुस्त झाल्यामुळे गेली तीन वर्षे उरण पनवेल, दादर बस व इतर बस सेवा बोकडविरा मार्गे बंद केल्यामुळे बोकडविरा,पाणजे, फुंडे, डोंगरी, म.रा.वि.म. वसाहतमधील विद्यार्थ्यांना, कामगार, सर्वसामान्य प्रवासी, रोजगाराला जाणाऱ्या महिलांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. सदर नादुरुस्त पूल सिडकोने त्वरित दुरुस्त करावा म्हणून सामाजिक संघटना, पत्रकार संघटना व नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर सदर बस सेवा ही द्रोणागिरी नोड मधून सुरू करण्यात आली. परंतु वेळेबरोबर पैशांचाही भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता. सदर बस सेवा द्रोणागिरी नोडमधून ही बिल्डर लॉबीच्या सोयीसाठी केली जात असल्याचा आरोप प्रवासीवर्गाकडून केला जात होता.
दरम्यान, याबाबत तहसीलदार आणि आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आगारप्रमुखांनी येत्या सोमवारपासून बस सुरू करण्याचे मान्य करून जनवादी महिला संघटनेला काही सकाळच्या बस फेऱ्यांचं वेळापत्रकही पाठवलं आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येप्रमाणे बस फेऱ्या वाढविण्यात येतील आणि सध्या तिकीट जुन्या पद्धतीने देतील, असेही सांगितले आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या प्रयत्नाला अखेर यश आल्याने प्रवासी व संबंधित ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.