| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अलिबामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी पत्रकार संघ आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंच यांच्या वतीने गुरुवारी (दि.4) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामनारायण पत्रकार भवन येथे ही सभा होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी दिली.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना तळागाळातील प्रश्न मार्गी लावण्याचा कायमच प्रयत्न केला. तसेच, पत्रकार म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी कायमच त्यांनी लढा दिला आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा म्हणून मीनाक्षी पाटील यांनी 15 वर्षे जिल्ह्यातील पत्रकारांचे खंबीरपणे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला.
मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (दि.29) मार्च रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी श्रद्धांजलीपर अलिबागमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी केले आहे.