शासकीय फलकावर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव
नेरळ । वार्ताहर ।
कर्जत-मुरबाड आणि नेरळ-कळंब राज्यमार्गावरील पोही फाटा येथे लावण्यात आलेल्या एमएसआरडीसीच्या शासकीय दिशादर्शक फलकावर खासगी कृषी पर्यटन स्थळ असलेल्या सगुणा बागेचे नाव लावण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवार दि. 23 मार्च रोजी एमएसआरडीसीने त्या फलकावरील सगुणा बाग असे नाव काढून त्या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील स्मारक मानिवली असे नाव लाण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोही फाटा येथे एमएसआडीसीने लावेल्या शासकीय दिशादर्शक फलकावर खासगी कृषी पर्यटन केंद्र असेलेले सगुणा बाग हे 9.9 किमीं अतरावर आहे असे दर्शविले होते. त्यावर कर्जत राष्ट्रवादी युवक काँग्रेच तालुकाध्यक्ष सागर शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 20 दिवसात सगुणा बाग नाव काढून त्या ठिकाणी हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव लावावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा एमएसआरडीसी ला देण्यात आला होता. तसे पत्र देखील एमएसआरडीसीचे अधिकारी आणि जिल्हयाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसात शासकीय फलकावरील सगुणा बाग नाव काढण्यात आले परंतू हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव लावण्यात आले नव्हते.
त्यामुळे त्या एमएसआरडीसीने लावण्यात आलेल्या शासकीय दिशादर्शक फलकावर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव 21 मार्च पर्यंत नाव लावले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या वतीने आंदोलन करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्या फलकावर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव लावण्यात येईल असा इशारा एमएसआरडीसीला देण्यता आला होता. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकारी वर्गाने बुधवार दि. 23 मार्च रोजी पोही फाटा येथे लावण्यात आलेल्या शासकीय दिशादर्शक फलकावर हुतात्मा हिराजी पाटील असे नाव लावेले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीचे आभार मानले आहेत.