तळा बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य

। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेत ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 2 कोटी 63 लाख रुपयांच्या विकासकामांसाठीच्या निधीतील जवळपास 54 लक्ष रुपयांचे हे काम असून तळा बसस्थानक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण असे या कामाचे स्वरूप होते. मात्र सदर रस्त्याच्या ठेकेदाराने कधी अशाप्रकारे काम केले नसावे अथवा त्यांना रस्त्याचे कॉक्रीटीकरण कशा प्रकारे करायला हवे याची बहुदा माहिती नसावी.

त्यामुळेच की काय बाजारपेठेतील या मुख्य रस्त्यावरील अवघ्या महिनाभरातच काही ठिकाणी खडी निघाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच या रस्त्याला आकार, उकार नसून मच्छीमार्केट येथील रस्त्याची लेव्हल ही वरखाली असल्याने या ठिकाणी नेहमी पाणी तुंबून राहते व त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे.चिखलाचे पाणी वाहनांच्या येण्याजाण्याने नागरिकांच्या अंगावर देखील उडत असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली तेव्हा बाजारपेठेतून प्रवास सुखकर होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र सदर रस्त्याचे गलथान काम झालेले पाहून आधीचाच रस्ता बरा होता व अशा कामापेक्षा विकास न झालेलाच बरा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Exit mobile version