तळा-रोहा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

| तळा | प्रतिनिधी |

तळा-रोहा मुख्य मार्गावरील फुगारेवाडी फाट्यानजीक पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर वाहून आल्याने वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनेक वाहने घसरल्याच्या घटना घडल्या असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नदीलगतच्या खासगी जागेवर साफसफाई करताना झाडे-झुडपे हटवून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे ही माती थेट मुख्य रस्त्यावर वाहून आली. परिणामी रस्त्यावर चिखलाचा थर साचल्याने चारचाकी, दुचाकी, मिनीडोअर, रिक्षा तसेच अन्य वाहनांना घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात आणि वाहने घसरण्याच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जागा मालकाच्या हल-गर्जीपणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मातीचा भराव आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर चिखल साचला असून, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहा) यांनी तातडीने रस्त्यावरील माती हटवून वाहतूक सुरक्षित करावी तसेच संबंधित जागा मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version