मुंबई गोलंदाजीत नापास

| मुंबई | वृत्तसंस्था |

आयपीएल 2024… लिलावापासून ते हंगाम सुरू होण्यापर्यंत सतत चर्चेत असलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स ! रोहितला कॅप्टन्सीवरून हटवणं, पांड्याला कर्णधार करणं, पांड्याविरूद्ध प्रचंड हुटिंग होणं या नॉन क्रिकेटिंग गोष्टींमुळंच ही फ्रेंचायजी चर्चेत आली. याचा परिणाम त्यांच्या सांघिक कामगिरीवर होणार नाही असं शक्यच नव्हतं. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात तो परिणाम आपल्याला दिसतोय. मात्र या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये देखील मुंबईनं आपलं वैशिष्ट्य जपलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई खडूसपणासाठी ओळखली जाते. आयपीएलमध्ये देखील ते कानामागून येत तिखट झाल्याचं अनेकवेळा आपण पाहिलं आहे. यंदाच्या हंगामात देखील त्यांनी समोर कोणतंही आव्हान आलं तरी ते चेस करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मग ते 287 धावांचं आव्हान असो किंवा दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचे 258 धावांचे आव्हान असो.

मुंबईच्या फलंदाज आपल्या संघाला 250 च्या जवळ घेऊन जाताना दिसतायत. मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांना विजयापर्यंत मात्र घेऊन जाऊ शकत नाही. कारण मुंबईची गोलंदाजी अत्यंत सुमार दर्जाची होत आहे. इम्पॅक्ट प्लेअरमुळं आधीच गोलंदाजांचे बुरे दिन सुरू झालेत. त्यात बुमराह सोडला तर मुंबईकडं असा हुकमी एक्का कोण नाही. बुमराहच्या चार षटकांचा अपवाद सोडला तर मुंबईचा प्रत्येक गोलंदाज जवळपास 10 च्या इकॉनॉमीने धावा देतोय. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात देखील हेच झालं. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ल्युक वूडनं 4 षटकात 68, तुषारानं 4 षटकात 56 धावा दिल्या. कर्णधार पांड्यानं तर कहर केला. त्यानं 2 षटकात 20 च्या इकॉनॉमीनं तब्बल 40 धावा दिल्या. दिल्लीकडून सलामीवीर जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं तर पॉवर प्लेचा पुरेपूर वापर कसा करायचा हाचा एक आदर्शच घालून दिला आहे. तो धावांकडं नाही तर स्ट्राईक रेटकडंच जास्त लक्ष देतोय असं वाटतं. जॅक फ्रेजर आणि अभिषेक पोरेल यांनी आठ षटकात 114 धावांची सलामी दिल्यानंतरच दिल्ली 250 धावांच्या पार जाणार हे स्पष्ट झालं होतं.

तसं दिल्लीनं करूनही दाखवलं. शाय होपच्या 17 चेंडूत 41 धावा, ट्रिस्टन स्टब्सच्या 25 चेंडूत 48 धावा टी 20 क्रिकेटचं बदलतं स्वरूप सांगून जातात. दिल्लीच्या पाच फलंदाजांनी 150 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटनं धावा ठोकल्या. आता दिल्लीच्या या धडाकेबाज फलंदाजीला तितक्यात फिअरलेस फलंदाजीनं उत्तर देणं गरजेचं होतं. ते मुंबईच्या पोरांनी करून दाखवलं. तिलक वर्मानं 32 चेंडूत 63 धावा ठोकल्या. हार्दिकनंही गोलंदाजीत दिलेल्या धावा फलंदाजीत वसूल करत नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानं 24 चेंडूत 46 धावा ठोकल्या. मात्र त्याच्याकूडन सामना फिनिश करण्याची अपेक्षा होती. तो भारताचा मॅच फिनिशर आहे. परंतु पांड्याला काही मोठा धमाका करता आला नाही. टीम डेव्हिडनेही 17 चेंडूत 37 धावा चोपल्या. त्यांनी मुंबई आता 257 धावांचं आव्हान पार करणार असं चित्र निर्माण केलं होतं. मात्र दिल्ली अन् मुंबईच्या संघातील फरक हा शेवटच्या षटकात दिसला. मुंबईला विजयासाठी 25 धावांची गरज होती. क्रिजवर अजून तिलक वर्मा होता. मात्र मुकेश कुमारनं पहिल्या चेंडूवर वर्माला हात खोलण्याची संधी दिली नाही. वर्मा देखील दोन धावा करून स्ट्राईक आपल्याकडे राखण्याच्या नादात धावबाद झाला. त्यानंतर रेकॉर्ड ब्रेक पिटाई झालेल्या ल्यूकनं बदला घेण्याच्या इराद्यानं मुकेशला षटकार मारला. मात्र मुकेशनं शेवटच्या षटकात फक्त 14 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळं मुंबई विजयाच्या जवळ पोहचूनही पराभूतच राहिली.

Exit mobile version