समृद्धीला प्राधान्य, कोकणाला दुजाभाव; राज्यकर्त्यांकडून फक्त आश्वासनांचे डोंगर
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे उद्यापही पुर्णत्वास न गेल्याने हे सरकारचे सर्वात मोठे अपयश ठरले आहे, असे स्पष्टपणे सांगावे लागत आहे. सतरा वर्षे उलटूनही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही, हे केवळ शासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचे, उदासीनतेचे आणि दुजाभावाचे जिवंत उदाहरण आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर कागदोपत्री हालचाली सुरू झाल्या. परंतु, प्रत्यक्षात कामाचा वेग अद्यापही तोकडाच आहे. गणेशोत्सव उंबरठ्यावर असताना माणगाव व इंदापूर शहरातील अपूर्ण वाह्यवळण रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी टळणार नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. 17 वर्षाच्या प्रवासानंतरही राज्यकर्त्यांनी महामार्गावर आश्वासनाचे डोंगरच दाखवले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांसह प्रवासी, पर्यटक व स्थानिक नागरिकात प्रचंड प्रमाणात चिड निर्माण होत आहे.
गणेशोत्सव काळात लाखो गणेशभक्त मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करून कोकणात जात असतात. त्यांना वारंवार महामार्गावरील खड्ड्यांना अन् तासन् तास लागणाऱ्या कोंडीला सामोरे जावे लागते. परंतु, याबद्दल सरकारला कसलीच खंत नाही. विदर्भात जाणारा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प राज्यकर्त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गाजवला. मुंबई-गोवा महामार्गानंतर सुरू केलेल्या या मार्गाचे जलदगतीने कामे पूर्ण झाली, उद्घाटन सोहळे झाले, प्रवासासाठी खुला करण्यात आला, तसेच श्रेय देखील लाटले गेले. परंतु, मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही का? कोकणातील जनतेचे प्रश्न, त्यांचे जीव, त्यांचा प्रवास याला काहीही किंमत नाही का? राज्यकर्त्यांनी दाखवलेला दुजाभाव आहे, असा आरोप कोकणवासीयांकडून केला जात आहे.
शासन आणि संबंधित विभागांनी हा महामार्ग वर्षानुवर्षे रखडवत ठेवल्यामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक झाला असून, अपघातांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. तर, व्यावसायिकांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत. कोकणची माणसं साधी भोळी म्हटलं जातं, ती सधी असली तरी त्यांना शासन आणि राज्यकर्त्यांनी हलक्यात घेऊ नये, त्यांच्या उद्रेकाची शासनानी वाट पाहू नये, अशी प्रतिक्रिया कोकणवायीयांकडून बोलताना व्यक्त होत आहे. इतक्या वर्षांचा विलंब, वारंवार होणाऱ्या उद्घाटनाच्या गाजावाजा, अपूर्ण बाह्यवळन रस्ते आणि खराब नियोजनामुळे कोकणातील जनतेच्या भावना वारंवार दुखावल्या जात आहेत. शासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून हा महामार्ग पूर्णत्वास नेणे ही वेळेची गरज आहे. अन्यथा प्रत्येक गणेशोत्सव आणि हंगामी सुट्टीत याच त्रासदायक चित्राची पुनरावृत्ती होत राहील. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे हीच खरी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु, हेच सत्ताधारी सध्या आपसातील अंतर्गत वादात गुरफटले गेले आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांना या माहामार्गाकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढता येत नाही. त्यांना प्रवाशांच्या जिवापेक्षा राजकारण महत्वाचे वाटत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासीयांकडून उमटत आहेत.
चाकरमान्यांची जीवघेणी धडपड
आज महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. खड्डे एवढे वाढले आहेत की, त्यातून प्रवास करत आपल्या गावी जाणे ही चाकरमान्यांसाठी जीवघेणी धडपड ठरत आहे. तात्काळ खड्डे भरण्याऐवजी ठेकेदार आणि विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसले आहेत. ही स्थिती म्हणजे शासनाच्या उदासीनतेचा कळसच म्हणावा लागेल. कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि भावनिक बंधांनी जोडलेला उत्सव आहे. या काळात लाखो भाविक आपल्या गावी जातात. परंतु, प्रत्येक वेळी त्यांना अपूर्ण महामार्गामुळे प्रचंड यातना भोगाव्या लागत आहेत.







