बसचे दोन तुकडे होऊनही वाचलो; कार्तिकने सांगितला थरारक अनुभव

। पनवेल । दीपक घरत ।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात ढोलताशा वाजवण्यासाठी गेलेल्या मुबंईतील गोरेगाव येथील युवकांच्या बसला खोपोली येथील घाटात अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि.15) घडली. चालक आणि वाहकासहित 42 प्रवासी असलेल्या या बसमधील 13 दुर्दैवी प्रवाशांचा मृत्यू झाला तर 29 प्रवासी या अपघातात बचावले. बचावलेल्या प्रवशांमध्ये दोनच प्रवासी असे आहेत कि, ज्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. यामध्ये कार्तिक बोराट आणि हर्ष धुरी या युवकांचा समावेश आहे.

अपघातानंतर कार्तिक बोराट याने पोलिसांच्या आपात्कालीन क्रमांकावर सपंर्क साधल्याने अपघातग्रस्तांना वेळीच मदत पोहचली. यामुळे कार्तिकचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कार्तिकने दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रम आटपून कार्तिक आणि त्याचे सहकारी रात्री अडीचच्या सुमारास मुबंईच्या दिशेने निघाले. यावेळी बस चालकाला दुसर्‍या दिवशी कामाला जायचे असल्याने तो बस वेगात पळवत असल्याचे कार्तिकला कळले. याच घाईत बस चालकाने मुबंई- पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणारी बस जुन्या मुबंई-पुणे महामार्गावर वळवली. मात्र यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस महामार्गावरील खोल दरीत कोसळली. यावेळी बसमधील इतर प्रवासी झोपले होते तर बसच्या मधल्या भागात बसलेला कार्तिक जागा होता.

काय होतेय हे कळायच्या आत बसचे दोन तुकडे होऊन छत उडाल्याचे कार्तिकच्या लक्षात आले. तर प्रवासी सीट असलेला भाग दोन टप्पे घेऊन सरळ झाल्याने कार्तिक दरीत असलेल्या दगडामध्ये जाऊन अडकला. यावेळी रात्रीचा अंधार असल्याने आणि अपघातामुळे दरीत धूर पसरल्याने सुरवातीला आपण जीवंत आहोत का? यावरच कार्तिकला विश्‍वास बसत नव्हता. मात्र अशातच स्वतःला सावरले आणि आजूबाजूच्या दहा मीटर परिघात पडलेल्या आपल्या जखमी मित्रांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी एका मित्राला मदत करण्याचा प्रयत्न केला असता इतर जखमी मित्र आपले पाय पकडून आपल्याला मदत कर अशी विनंती करत असल्याचे लक्षात येताच कार्तिकने तात्काळ मोबाईलवरून पोलीस मदत कक्षाशी संपर्क साधत अपघाताची माहिती दिली.

मदत कक्षाकडून देखील तात्काळ कार्तिकने दिलेल्या माहितीची दखल घेण्यात आल्याने अपघातानंतर केवळ दहा मिनटातच पोलीस आणि बचाव पथक अपघातस्थळी पोहचल्याची माहिती कार्तिकने दिली. पोलिसांसोबत आलेल्या बचाव पथकाने फक्त वीस मिनटांतच बचावकार्य करण्यास सुरवात केल्याने अनेक जखमींना वेळेत मदत पोहचल्याचेही त्याने सांगितले.

पुन्हा उभे करणार ढोल पथक
सतीश धुमाळ (वय 21) आणि कार्तिक बरोट (वय 19) हे तरुण बाजीप्रभू ढोलताशा पथक या नावाने गोरेगाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या या अपघातग्रस्त ढोल पथकाचे नेतृत्व करत होते. अपघातात सतीश यांचा मृत्यू झाला आहे. तर वयाच्या दहाव्या वर्षापासून ढोलताशा पथकात असलेला कार्तिक अपघातातून बचावला आहे. मात्र या अपघातात ढोलताशा पथकाकडे असलेल्या वाद्य साहित्याचे नुकसान झाले असले तरी या घटनेतून सावरल्यानंतर पुन्हा ढोलताशा पथक उभे करणार असल्याचा विश्‍वास कार्तिकने व्यक्त केला.

या भीषण अपघातात दगडामध्ये अडकून वाचलो. अशा परिस्थितीत मोबाईलही सुरक्षित राहिला. सर्वत्र जखमी मित्र मदतीची विनंती करीत होते. सर्वांना एकट्याने मदत करणे शक्य नव्हते. त्यावेळी मोबाईल काढला तर केवळ 5 टक्के बॅटरी शिल्लक होती. दैव बलवत्तर म्हणून तातडीने पोलिसांसोबत संपर्क झाला. पोलिस आणि बचाव पथक तातडीने आले आणि जखमींना तात्काळ मदत मिळाली.

कार्तिक बोराट, प्रवासी, गोरेगाव, मुंबई
Exit mobile version