। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवासाठी राजापूर तालुक्यात दाखल झालेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या मार्गावर असून, त्यांच्या उपस्थितीमुळे एसटी आगारासह सोल्ये येथील कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर रोड स्टेशनही गजबजून गेले होते.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी तालुक्यात दाखल झाले होते. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी येथील एसटी आगारानेही नियोजन केले आहे. परतीच्या मार्गाचे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी ऑनलाईन आरक्षण केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये जाणार्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आगार प्रशासनाने जादा गाड्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. आगारातील चालक, वाहक, तांत्रिक विभागातील कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या आगारातील उपस्थितीमुळे आगार गजबजून गेलेले पहायला मिळत आहे. तसेच, कोकण रेल्वेमार्गावरील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकदेखील प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
महागडा खासगी प्रवास
चाकरमानी मुंबईला परतत असताना त्यांना तिकीट न उपलब्ध होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी खासगी गाड्या वा ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. पंरतु, त्यांचे वाढलेले तिकीटदरही प्रवाशांना न परवडणारे आहेत. ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यासाठी सद्यः स्थितीमध्ये बाराशे ते पंधराशे रुपये एका तिकिटाला मोजावे लागत आहेत.