विरोधी पक्ष नेत्याची कारवाईची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील 100 वर्षे जुन्या गिरीस्थान नगरपरिषदचे प्रशासकीय कार्यालय असलेली इमारत आपत्कालीन व्यवस्थापन या नियमाचा आधार घेऊन दुरुस्त आणि नूतनीकरण केले जात आहे. मात्र, आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या अधिकारात कामे केली जाऊ शकतात. परंतु, त्यासाठी कमाल दोन लाखाची तरतूद असू शकते. मात्र, 24 लाखाचे काम कोणत्या अधिकारात मंजूर करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे रायगड जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनच आपत्कालीन व्यवस्थापन मधील कामे करावी लागतात. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून सध्याची आपत्कालीन परिस्थिती नसताना हेरिटेज कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने सरकार या प्रकरणाची चौकशी करणार का? असा प्रश्न माथेरान नगरपरिषदमधील विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांनी केला आहे.
हेरिटेज वास्तू म्हणून नोंद असलेल्या गिरीस्थान नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. माथेरान पालिकेत लोकनियुक्त सदस्य मंडळ अस्तित्वात आले; परंतु, पालिकेच्या सदस्य मंडळाची सर्वसाधारण सभा झालेली नसताना नगरपरिषद कार्यालयाचे दुरुस्ती आणि नूतनीकरण केले जात आहे. हे काम करण्यासाठी 58/2 या कायद्याचा आधार घेण्यात आला असून, त्या कायद्याच्या आधारे आपत्कालीन परिस्थितीत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना कामे करण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्या पावसाळा नाही आणि माथेरानमध्ये कोणतेही आपत्कालीन परिस्थिती नाही. माथेरान पालिकेचे कार्यालय हे देखील सुस्थितीत असताना सुशिभिकरणाच्या नावाखाली तेथे आपत्कालीन व्यवस्थापन हा निकष लावून कार्यालयाची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी देखील तेथे सुरू करण्यात आलेली दुरुस्तीची कामे ही जेमतेम दोन लाख निधीपर्यंत मर्यादा असते; मात्र, माथेरान नगरपरिषद कार्यालयाची इमारत दुरुस्ती आणि नूतनीकरण ही कामे करण्यासाठी 24 लाखाचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना त्या कामाला नगरविकास सह सचिव दर्जाचे अधिकारी असलेले जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. सध्या पावसाळा किंवा आपत्कालीन स्थिती नसल्याने रायगड जिल्हाधिकारी अशा चुकीच्या पद्धतीने समोर आलेल्या कामाला मंजूरी देण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, रायगड जिल्हाधिकारी यांनी माथेरान पालिकेच्या इमारतीचे दुरुस्तीच्या कामाला परवानगी आहे किंवा नाही हे देखील अद्याप समोर आलेले नाही.
इमारतीचे नूतनीकरण काम सुरू असल्याने माथेरान पालिकेचे विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांनी आक्षेप घेतला होता. माथेरान हे हेरिटेज शहर म्हणून ओळखले जात असून, या इमारतीच्या जागेवर पालिकेने शासनाची परवानगी घेऊन ऐतिहासिक ठरेल अशी इमारत उभारावी. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा भव्य वास्तू उभी करावी, जेणेकरून अशी वास्तू पाहण्यासाठी पर्यटक, अभ्यासक येऊ शकतात अशी सर्वसामान्य भावना सीताराम कुंभार यांनी व्यक्त केली आहे. या स्थितीत सुरू असलेले काम थांबवून रायगड जिल्हाधिकारी यांनी संबंधित कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माथेरान पालिकेचे विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांनी केली आहे.
