नगरपरिषदेची फायर बाईक धूळखात

प्रशासकीय नियोजनाअभावी बनली शोपीस

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरासह परिसरातील अरुंद रस्ते तसेच संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंगी “फर्स्ट रिस्पॉन्डर” म्हणून तात्काळ पोहोचण्यासाठी नगरपरिषदेत 2024 साली अत्याधुनिक “रॉयल एनफिल्ड फायर बाईक” दाखल झाली आहे. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे सध्या ती धूळ खात पडून असल्याचे चित्र समोर आले आहे.

श्रीवर्धन मधील गल्लीबोळांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी आगीची घटना घडल्यास नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे अवजड वाहन वेळेत पोहोचणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून उच्च क्षमतेची रॉयल एनफिल्ड फायर बाईक ही 2024 साली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलात दाखल करण्यात आली होती. या मॉडिफिकेशन बाईकवर हाय-प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम (अंदाजे 60 लीटर क्षमता), फॉम आणि अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे बसवण्यात आली आहेत. या जड आणि अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली बाईक चालवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मात्र, नगरपरिषदेकडे आवश्यक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या दुचाकीचा वापर होत नाही. त्यातच वेळेवर योग्य देखभाल न झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे सध्या रॉयल एनफिल्ड बाईक नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. तसेच, आणीबाणीच्या काळात या बाईकचे कॉल मॅनेजमेंट आणि वाहतूक कोंडीतून कसा प्रभावी वापर करायचा, याची कोणतीही नियोजन यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणलेली ही यंत्रणा केवळ शोपीस म्हणूनच राहिली आहे.

ही फायर बाईक प्रशासकीय कार्यकालामध्ये आणण्यात आली होती. त्याकरिता लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याकारणाने ती फायर बाईक वापरात नव्हती. सद्यस्थितीत त्यावर तोडगा काढण्यात आलेला असून, लवकरच ही फायर बाईक सेवेमध्ये रुजू होइल.

ॲड. अतुल चौगुले,
नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषद
Exit mobile version