| पनवेल । वार्ताहर ।
लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित लसीकरण महत्वाचे असते. हे लसीकरण वेळोवेळी होणे गरजेचे असल्यानेनियमित लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या अनुशंगाने पनवेल महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजनांचा आढावा सोमवार (19) सप्टेंबर रोजी सिटी टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिकेच्या मुख्यालयात सिटी टास्क फोर्स अर्थात नियमित लसीकरण मोहिमेची कार्यकारी समितीची सभा सोमवारी उपायुक्त सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत महापालिका क्षेत्रातील नियमित लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जन्मजात बाळापासून ते वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत मुलांना बीसीजी, कावीळ, पोलिओ अशा विविध प्रकारच्या 13 लसींचे नियमित लसीकरण महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.
तसेच महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भाग, पाडे, शहरी भागातील 270 ठिकाणी यासाठीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. या बैठकीला प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. गिरीश गुणे, चारी प्रभागाचे प्रभाग अधिकारी,जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अरूण काटकार, डॉ. प्रियांका माळी, सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी नियमित लसीकरण केले जाते. महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनी या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा. – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका