नागरिकांच्या समस्या सोडवताना नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर अडचणी
| खोपोली | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कामासाठी खोपोली नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर नेमण्यात आल्याने नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. याचा थेट फटका नागरिकांना तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांना बसत असून, नागरिकांच्या समस्या वेळेत न सुटल्याने नगरसेवकांना नाराजीला सामोरे जावे लागत आहे.
मागील महिन्यात खोपोली नगरपालिकेची निवडणूक पार पडली. दि. 9 जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला असून, सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नगरपालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिक मोठ्या अपेक्षेने नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन येत आहेत. परंतु, अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याने या तक्रारींचे निराकरण होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष नगरसेवकांवर व्यक्त होत असून, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी अडचणीत सापडले आहेत. लवकरच अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीतून मुक्त होतील, त्यानंतर नगरपालिकेचे कामकाज पूर्ववत होईल, अशी अपेक्षा नवनिर्वाचित नगरसेवक व्यक्त करत आहेत. तोपर्यंत नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या, हा प्रश्न मात्र कायम आहे.







