। पनवेल । प्रतिनिधी ।
स्कायलाइन सोसायटी, सेक्टर 3, करंजाडे येथे राहणाऱ्या शुभम पवार (28) या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम मारुती पवार हा इलेक्ट्रिशन म्हणून नोकरी करतो. तो कामावरून घरी आला आणि त्यानंतर मित्राचा फोन आल्याने तो कामासाठी घरातून बाहेर गेला. त्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे नातेवाईकांकडून पनवेल शहर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार करण्यात आली. त्याचा शोध घेत असताना बुधवारी (दि.8) वरचे ओवळेमधील रिक्षा स्टॅन्डच्या समोर सेक्टर 1 या ठिकाणी त्याची मोटरसायकल पडलेली दिसली. तसेच, त्याच्याजवळ असलेले इलेक्ट्रिशनचे काम करण्याचे सामान देखील अस्ताव्यस्त पडलेले होते. दुपारी दोनच्या सुमारास वरचे ओवळेमधील महात्मा फुले कॉलेजच्या जवळील पाण्याच्या टाकीच्या मागे डबक्यात त्याचा मृतदेह सापडून आला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी शवविच्छदन अहवालात शुभम याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समजले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल शहर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.







