पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाचा खून

। सांगली । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाच्या निर्घृण खूनाची घटना घडली आहे. विक्रम वाघमारे (वय 35) असे खून झालेल्याचे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आप्पासाहेब दिनकर पिंगळे (वय 54), राहुल आप्पासाहेब पिंगळे (वय 30) आणि लता आप्पासाहेब पिंगळे (वय 50) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे जप्त केली आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब पिंगळे वीट विक्री एजंट आहेत. त्यांचा मुलगा राहूल आणि विक्रम दोघे मित्र होते. 2016 मध्ये विक्रमने पिंगळे कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केला होता. त्या प्रकरणी राहुल याने विक्रम याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तो गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान गुन्हा मागे घेण्यासाठी विक्रमने पिंगळे कुटुंबाकडे तगादा लावला होता. यावरून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती.
विक्रम हे प्रकरण मिटवण्यासाठी पिंगळे यांच्याकडे गेला असता उभयंताता वाद झाला. अखेर तिघांनी विक्रम याला काठीने, दांडक्याने मारहाण केली. मुख्य संशयित आप्पााहेब पिंगळे याने दगडी पाटा विक्रम याच्या डोक्यात घातला. यामध्ये विक्रमचा मृत्यू झाला. आप्पासाहेब पिंगळे पोलीस ठाण्यात हजर झाला.त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच राहुल आणि खुनात सहभाग असण्याच्या शक्यतेने लता यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version