मोरीचे काम थांबवले
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुरूड तवसाळकर लॉजच्या समोरील रस्त्याजवळ मोरीचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाला अर्थसंकल्प निधीतुन 29.73 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने या मोरीचे काम सब कॉन्ट्रक्टर मोन्नाक यांच्याकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने दि.16 जुन रोजी मुरूड शहर संघर्ष समिती व स्थानिक नागरिक एकत्र येऊन मोरीची पाहणी केली. त्यानंतर ते काम थांबविण्यात आले होते. तसेच, याबाबत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरूड सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार व मुरुड जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना रितसर निवेदन देण्यात आले होते. या निवदेनात, मोरीची उंची कमी करून, खोली व रुंदी वाढवावी अशी मागणी केली होती. तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र या निवेदना पैकी एकच मागणी मान्य केल्याचे निदर्शनास आले. सब कॉन्ट्रक्टर याने चार दिवसांपूर्वी पुन्हा या मोरीचे काम सुरू करून, मोरीची उंची फक्त कमी केली. त्यामुळे सब कॉन्ट्रक्टर या मोरीची रुंदी व खोली वाढवत नसल्याने बुधवारी (दि.1) मुरूड शहर संघर्ष समिती व स्थानिक नागरिक आक्रमक होऊन ते काम पुन्हा थांबविण्यात आले. यावेळी त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात धडक दिली. परंतु, इंजिनिअर उपलब्ध नसल्याने कार्यालयात उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कनिष्ठ अभियंता अजित संगळे यांना भ्रमणध्वनी द्वारे मोरी संदर्भात चर्चा केली. या चर्चेमध्ये कॉन्ट्रक्टरला तात्काळ काम थांबविण्यात सांगून दोन दिवसांत स्वतः येऊन मोरीची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी कुणाल सतविडकर, ललीत जैन, स्वप्निल कवळे, महेश कारभारी, ऋत्विक मकु, स्वप्निल कवळे, उदय पेटकर, विशाल कोलवणकर, सरपाटील, बाबु तांबुळकर, अरविंद गायकर आदिंसह संघर्ष समिती पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.







