मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड पासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी 52 वर्षीय नराधमाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना गुरुवारी (दि.19) दुपारच्या सुमारास घडली असून, यांनतर आरोपी फरार आहे. या आरोपीचा शोध मुरुड पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घराखाली खेळत होती. त्यावेळी आरोपीने ओळखीचा फायदा घेत तिला बोलावून घेऊन आपल्या घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. तसेच मोबाइलमध्ये अश्लील फोटो दाखवत तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मुलीने आपल्या सोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबीयांनी तात्काळ मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला अलिबाग जिव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आमच्या मुली खरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता पालक उपस्थित करत आहेत. संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून आरोपी विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रसेडे करीत आहेत. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version