मुरुड तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका

आंबा, कांदा, वालपिक धोक्यात
शेतकरी-बागायतदार धास्तावला

| कोर्लई | वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात मंगळवारी सकाळच्या पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोहोरलेले आंबा, पिक, कांदा, वाल आदी. कडधान्य पिकाला मोठा धोका पोहोचल्याने शेतकरी – बागायतदार अक्षरश: धास्तावले आहेत. यंदा बहुतेक सर्व पिके बहरली होती. निसर्गाच्या तांडवामुळे पिके नेस्तनाबुत होतील की काय? अशी भिती व्यक्त होत आहे.

मंगळवारी सकाळी तालुक्यात साळाव पासून बोर्ली- मांडला, साळाव, बारशिव, काशिद, सुपेगाव, तळेखार पट्ट्यात मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली तर काही ठिकाणी जोरदार बरसाला, या पावसामुळे वीटभट्टी, कलिंगड, फळ-भाजीपाला पिकाला धोका पोहोचल्याचे समजते. तसेच या विचित्र अवकाळी हवामानाचा परिणाम मासेमारीवर देखील झाला असून मासेमारी ठप्प झाली आहे. याबाबत राजपूरी येथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी यांनी सांगीतले कि, या पावसामुळे मुरुड परीसरातील समुद्रात मासेमारीवर परीणाम झालाआहे. ऐन होळी सणाच्या वेळी जवळा सारखी छोटी मासळी यंदा मिळाली नाही. सण जेमतेमच साजरा करावा लागला. सध्या ढगाळ वातावरणामुळे छोटी मासळी मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

तालुक्यात अजूनही वीटभट्टी व्यवसाय
मोठ्या प्रमाणात चालतो. यासाठी बँकेतून काही जणांनी कर्ज काढलेले आहे. या व्यावसायिकांना अवकाळीमुळे नुकसानीला सामोरे जाव लागणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.

नवीन पिढी पावसाचा महिना विसरणार?
पावसाळा हिवाळा उन्हाळा तीन ऋतू असून गेल्या काही वर्षांपासून- वेळी-अवेळी-अवकाळी पडणारा पाऊस यामुळे पावसाचा महिना नेमका कोणता ?असा प्रश्न नवीन पिढीला पडला नाही तर नवलच!

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस,वादळी वारा आणि गारपीट होत आहे. तसेच दिवसाचे तापमान 35°c च्यावर आणि रात्रीचे तापमान 15°c च्या खाली जात आहे. त्यामुळे सापेक्ष आद्रतेवर परिणाम होऊन मोहर सुकणे, वाटाण्याच्या आकाराची फळे गळणे आणि बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन आंबा फळबागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास फळझाडांना दर आठवड्याला 150 ते 200 लिटर पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुंध्याजवळ गवताचे आच्छादन करावे. आणि 14 आणे तयार झालेली फळे काढणी करावी. तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केल्याप्रमाणे डेल्टामेथ्रीन २.८ ℅ 9 मिली किंवा लॅमडासायहॅलोत्रिन 5 ℅ 6 मिली किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति दहा लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्साकोनोझोल 5 मिली किंवा गंधक 80% 20 ग्रॅम किंवा कार्बनडेँन्झिम 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत हॉटसँप या योजनेअंतर्गत आंबा आणि काजू बागांचे नियमित निरीक्षणे घेऊन त्यांच्यावरील उपाय योजना शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करण्यात येत आहे.असे तालुका कृषी अधिकारी श्रीम. मनीषा भुजबळ यांनी सांगितले.

Exit mobile version